संभाजी ब्रिगेड

व्याख्या व ओळख

संभाजी ब्रिगेड (Sambahji Brigade) या नावातील “संभाजी” हे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती, शिवपुत्र संभाजी महाराजांचे नाव असून ब्रिगेड या इंग्रजी शब्दाचा अर्थ “विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून काम करणाऱ्या शिस्तबद्ध व समर्पित लोकांचा समूह” असा आहे. थोडक्यात संभाजी ब्रिगेड म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना आपले आदर्श मानून समाजातील एकत्र आलेल्या वैचारिक व समर्पित युवकांची शिस्तबद्ध संघटना असा अर्थ संघटनेच्या नावातून प्रतीत होतो. प्रविणदादा गायकवाड हे या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असुन महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र आणि भारताबाहेरही संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यरत आहेत. अप्रत्यक्षरीत्या संभाजी ब्रिगेडची विचारधारा मानणारा आणि त्या विचारधारेचा पुरस्कार करणारा एक मोठा हितचिंतक आणि समर्थक वर्ग समाजात आहे.

संभाजी ब्रिगेड समजून घेताना...

संभाजी ब्रिगेड समजून घेण्यासाठी संघटनेच्या विविध विषयांमधील भूमिका काय आहेत, हे आपणास माहीत असायला हवे. त्या भूमिका पुढीलप्रमाणे :

१) सामाजिक : 

संभाजी ब्रिगेड ही मराठा समाजाच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्यातील प्रश्नांवर अभ्यासू आणि आक्रमक पद्धतीने काम करणारी सामाजिक संघटना आहे. ती पुरोगामी, विज्ञानवादी आणि प्रागतिक विचारसरणीचे समर्थन करते. मराठा समाजाच्या प्रश्नांवर काम करत असतानाच समाजातील सर्व जातीधर्माच्या घटकांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करुन आपापसातील दरी कमी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने नेहमी पुढाकार घेतला आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने आपल्याकडील वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य व पैसा यापैकी जे शक्य असेल दान देऊन समाजाप्रती असणारे आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत राहावे हा संभाजी ब्रिगेडचा विचार आहे.

२) इतिहास : 

इतिहास हे जसे शास्त्र असते, तसेच ते शस्त्रही असते. इतिहासाच्या शास्त्रामध्ये खोट्या गोष्टी घुसडून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी त्याचा शस्त्रासारखा वापर करणाऱ्या प्रवृत्तींना संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. अस्सल संदर्भ साधनांच्या साहाय्याने आपल्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ पद्धतीने पुनर्लेखन व्हावे आणि नव्या पिढीच्या हातात खरा इतिहास जावा यासाठी संभाजी ब्रिगेडने सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. प्रसंगी इतिहासाच्या क्षेत्रात विकृतीकरण करणाऱ्यांना आक्रमकपणे धडा शिकवणारी संघटना अशी संभाजी ब्रिगेडची ओळख आहे. समाजापर्यंत खरा इतिहास पोहोचवणारे लेखक, वक्ते, शाहीर, कवी, साहित्यिक घडवण्याचे आणि त्यांना बळ देण्याचे काम संभाजी ब्रिगेड नेहमी करत आली आहे.

३) आर्थिक :

देशाने खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण धोरण स्वीकारल्यानंतर आर्थिक जगात फार मोठे बदल झाले आहेत. या बदललेल्या जगाची पावले ओळखून संभाजी ब्रिगेडने समाजात आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ सुरु केली आहे. छत्रपती शिवरायांच्या “अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुख आपला” या संकल्पनेवर निष्ठा ठेवून संभाजी ब्रिगेडने “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला” ही नवीन संकल्पना मांडली आहे. “नवी दिशा नवा विचार” हे ब्रीद घेऊन संभाजी ब्रिगेडने राज्यभर बिझनेस कॉन्फरन्स सुरु केल्या आहेत. त्या माध्यमातून युवकांना देश-परदेशात उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या उपलब्ध असणाऱ्या संधी याविषयी मार्गदर्शन केले जाते. मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी बनावी हे संभाजी ब्रिगेडचे ध्येय आहे.

४) धार्मिक :

संभाजी ब्रिगेड ही भारतीय राज्यघटनेला सर्वोच्च मानते आणि राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या स्वातंत्र्याचा आदर करते. आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला धार्मिक उपासनेचा, आपापले धर्मस्वातंत्र्य जपण्याचा तसेच धार्मिक बाबींवर आपले मत मांडण्याचाही अधिकार आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना विज्ञानवादी विचारांवर अधिष्ठान ठेवते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेचा संघटनेवर प्रभाव आहे. धर्मातील चांगल्या बाबी जरुर स्वीकाराव्यात, मात्र त्या स्वीकारत असताना त्यावर चढलेली चमत्कार, कर्मकांड, कालबाह्य परंपरा, अनिष्ट रुढी, अंधश्रद्धा, चुकीच्या व अमानवी प्रथा इत्यादिंची पुटे बाजूला सारायला हवीत अशी संघटनेची भूमिका आहे.

५) राजकीय :

संभाजी ब्रिगेड ही बिगरराजकीय सामाजिक संघटना असून ती लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवते. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांची विचारधारा मानणाऱ्या आणि या विचारधारेला पाठबळ देणाऱ्या राजकीय घटकांना सहकार्य करण्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी घेतली आहे. संघटनेच्या केंद्रीय बैठकीत कार्यकारी मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जातात आणि त्यानंतरच लोकशाही पद्धतीने बहुमत घेऊन राज्यस्तरावरील कुठलीही राजकीय भूमिका निश्चित केली जाते. स्थानिक पातळीवर संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला व्यक्तिगत स्वरूपाचे राजकीय निर्णय घेण्याचेही स्वातंत्र्य दिले जाते. तथापि संभाजी ब्रिगेड ही संघटना कुठल्याही विशिष्ट पक्षाशी बांधील नाही हे संघटनेने अनेक प्रकरणांमध्ये आक्रमक व विरोधाची भूमिका घेऊन दाखवून दिले आहे.

६) आरक्षण :

पूर्वीपासूनच मराठा समाज “उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी” या मानसिकतेत जगत होता. परंतु जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीची वाताहत झाल्याने मराठा समाजासमोर भवितव्याची चिंता निर्माण झाली. अशा काळात संभाजी ब्रिगेडने जनगागृती करून मराठा समाजाला आरक्षणाचे महत्व पटवून दिले. एकेकाळच्या आरक्षण विरोधक मराठा समाजाला आरक्षण समर्थक बनवले. आक्रमकपणे मराठा आरक्षणाची भूमिका मांडून कायदेशीर आणि रस्त्यावरील लढाई लढली. अनेकदा प्रयत्न करुनही घटनात्मक तरतुदी आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सूटत नाही हे लक्षात आल्यानंतर समाजाला खुल्या वर्गातील आर्थिक निकषावरील EWS आरक्षणाची बाजू पटवून सांगितली. संभाजी ब्रिगेडने आता मराठा समाजाला आरक्षणाच्या “अ” कडून अर्थकारणाच्या “अ” कडे घेऊन जाण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

संभाजी ब्रिगेड नक्की काय काम करते ?
आपल्यालाही संभाजी ब्रिगेडमध्ये सामील व्हायचे आहे का ?

संभाजी ब्रिगेड ही नेमके कोणते काम करते याविषयी लोकांच्या मनात कुतुहूल, गैरसमज किंवा अपूर्ण माहिती असू शकते. परंतु वास्तव जाणून घेतल्याशिवाय एखाद्याविषयी मत बनवणे योग्य नाही हे जागतिक सत्य आपण स्वीकारले पाहिजे. संभाजी ब्रिगेड नेमके काय काम करते हे पुढे दिले आहे. ते जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आमच्यासोबत काम करायची इच्छा असेल, तर आपले संभाजी ब्रिगेडमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे.

१) रोजगार : 

तरुणांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख ध्येय आहे. त्यासाठी समाजातील सुशिक्षित व कौशल्यप्रपात गरजू तरुणांना सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे, तसेच देश-परदेशातील रोजगाराच्या विविध संधींची माहिती करुन देण्याचे काम संभाजी ब्रिगेड करते. “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला” या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडने अनेक तरुणांना परदेशात नोकरी मिळवून देण्यात सहकार्य केले आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने दरमहा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन करुन तरुणांना नवनवीन उद्योग व्यवसायांची माहिती, भांडवल उभा करण्यासाठी बँकांकडून व शासकीय योजनांच्या माध्यमातून होणारा पतपुरवठा तसेच बाजारपेठांमधील सद्यस्थितीचा अभ्यास असणाऱ्या जाणकारांची मनोगते अशा विविध कळीच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाते.

२) नोकरदार :

अनेक नोकरदार समाजबांधवांना परप्रांतीय किंवा स्थानिक कंपन्यांकडून तसेच कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये पिळवणूक, फसवणूक किंवा मानसिक छळ करुन त्रास दिला जातो. अशा ठिकाणी संभाजी ब्रिगेडने सामाजिक दबावगट म्हणून आंदोलन, उपोषण, समज अशा वेगवेगळ्या माध्यमातून अनेक बांधवांचे प्रश्न मार्गी लावून त्रासातून त्यांची मुक्तता केली आहे.

३) विद्यार्थी :

शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासून ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला लागेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये संभाजी ब्रिगेड विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. शिक्षणाचे बाजारीकरण, शाळा-कॉलेजांमधील भरमसाठ फी, खाजगी क्लासेसवाल्यांकडून होणारे आर्थिक शोषण, रॅगिंगसारखे गैरप्रकार, विविध शासकीय दाखले मिळवताना येणाऱ्या अडचणी, अभ्यासक्रमातील चुका, शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, परीक्षा व निकालांमध्ये होणारी दिरंगाई, रोजगाराचे प्रश्न, इत्यादि अनेक प्रकारचे विषय संभाजी ब्रिगेडने यशस्वीरीत्या हाताळले आहेत.

४) आरोग्य :

सर्वसामान्य नागरिकांचे दवाखान्यांमधून होणारे आर्थिक शोषण, आरोग्यविषयक सुविधांबद्दलच्या लोकांना असणारा माहितीचा अभाव, रात्री अपरात्री अचानकपणे लागणारी कोणत्याही प्रकारची तातडीची मदत, अपघात, याबाबतीत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अहोरात्र गरजूंची मदत करण्यासाठी तत्पर असतात. गोरगरिबांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून जनजागृती केली जाते.

५) आपत्ती व्यवस्थापन :

आपल्या आजूबाजूला कुठेही महापूर, भूकंप, भुस्खलन, अपघात, पडझड, ट्रॅफिक, इत्यादि सारखी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली, तर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे संबंधित ठिकाणी जाऊन मदत आणि बचावकार्य करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत असतात. या कामांसाठी विविध जिल्ह्यांमध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा अनुभव असणाऱ्या तरुणांच्या “रेस्क्यू टीम” तयार करण्यात आल्या आहेत. संभाजी ब्रिगेडने “फ्लड रिलीफ फंड”च्या माध्यमातून राज्यात आलेल्या महापुराच्या वेळी पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक व आर्थिक स्वरूपाची मदत पोहोचवली आहे.

६) क्रिडा :

महाराष्ट्राच्या ग्रामीण-शहरी भागातील गरीब आणि गरजू कुटुंबातील उदयोन्मुख खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षणाची सोय, विविध ठिकाणच्या स्पर्धांच्या वेळी त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था करणे, सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांच्या पाठीशी आर्थिक पाठबळ उभे करणे, इत्यादि बाबतीत संभाजी ब्रिगेड नेहमी सहकार्य करत आली आहे.

७) गडकिल्ले :

गडकिल्ले म्हणजे आपल्या इतिहासाचा वारसा आहेत. या वारशाचे जतन व संवर्धनाचे काम करण्यासोबतच असे काम करणाऱ्या संस्थांना संभाजी ब्रिगेडचे नेहमी सहकार्य असते. गडकिल्ल्यांवर होणारी गैरकृत्ये व अनधिकृत बाबी रोखणे, मद्यपान व अश्लील चाळे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे, गडकिल्ल्यांच्या प्रश्नांसंदर्भात शासनावर दबाव निर्माण करणे, लोकांमध्ये लहानपणापासूनच गडकिल्यांविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून गडकोट भ्रमंती मोहिमांचे आयोजन करणे, इत्यादि अनेक प्रकारचे कामे संभाजी ब्रिगेडने केली आहेत.

८) सांस्कृतिक :

संभाजी ब्रिगेडने प्रबोधनाच्या चळवळीच्या माध्यमातून तरुणांना वैचारिक दिशा देण्याचे काम केले. समाजात वाचनाची चळवळ निर्माण करुन तरुणांचे मन, मेंदू, मस्तक, मनगट, मणका सशक्त करण्याचे काम केले. स्वतंत्र बुद्धीने विचार आणि लिखाण करणाऱ्या वैचारिक तरुणांची पिढी निर्माण केली. साहित्य, संस्कृती, चित्रपट, नाट्य, संगीत, कला, इत्यादि विविध माध्यमातून होणारी इतिहासाची मोडतोड आणि चुकीच्या इतिहासाचा प्रसार रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमकपणे लढत आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे महाराष्ट्रातील धार्मिक व जातीय दंगली कमी झाल्या आहेत.

मागच्या २५ वर्षांतील
संभाजी ब्रिगेडची काही प्रमुख कामे :

१) २००३-०४ साली अमेरिकन लेखक जेम्स लेनच्या बदनामीकारक पुस्तकावर कायदेशीर बंदी आणून त्याला लिखाणासाठी मदत करणाऱ्या पुण्यातील भांडारकर संस्थेवर कारवाई केली.

२) २००८ साली रायगडवरील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला.

३) मराठा समाजाला आरक्षणाचे महत्व पटवून दिले आणि २००९ मध्ये आरक्षणासाठी शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर फोडले.

४) ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसल्याचे सिद्ध केले आणि २०१० साली कायदेशीर मार्गाने लालमहालात कोंडदेव शिल्प हटवले.

५) रायगडवरील शिवसमाधी शेजारी उभा केलेला अनैतिहासिक व काल्पनिक वाघ्या कुत्र्याचा पुतळा २०१२ साली हटवला आणि कायदेशीर मार्गाने त्याविरुद्ध लढा सुरु केला.

६) शिवचरित्राची मोडतोड आणि मराठा कुणबी स्त्रियांची खालच्या पातळीवर बदनामी करणाऱ्या पुरंदरेंना २०१५ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यास विरोध करुन जनजागृती केली.

७) २०१६ सालच्या मराठा क्रांती मोर्चाचे अनेक जिल्ह्यांमध्ये यशस्वी आयोजन व संयोजन करण्यात पुढाकार घेऊन त्यात सिंहाचा वाटा उचलला.

८) छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या राम गणेश गडकरींचा पुतळा २०१७ साली पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातून हटवला.

९) बिडीच्या बंडलाला देण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव आणि फोटो हटवण्याचे ऐतिहासिक काम २०२० साली केले.

१०) मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन व कायदेशीर पेचप्रसंगावर चिंतन करुन आर्थिक निकषावरील EWS आरक्षणाची बाजू मराठा समाजाला पटवून देण्याचे काम केले.

११) मराठा तरुणांनी आरक्षणाकडून अर्थकारणाच्या दिशेने वाटचाल करावी यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये दरमहा बिझनेस कॉन्फरन्स तसेच दुबई आंतरराष्ट्रीय अभ्यासदौरे सुरु केले.

१२) “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला” संकल्पनेच्या माध्यमातून हजारो तरुणांना आखाती देश, पोलंड, रोमानिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, इत्यादि विविध देशांमध्ये रोजगार उपलब्ध करुन दिला.

पुढील २५ वर्षांसाठी संभाजी ब्रिगेडची दिशा

गेली ३०-४० वर्षे मराठा समाजाचा वेळ, पैसा आणि ताकत या गोष्टी आरक्षण या एकाच विषयभोवती केंद्रित झाल्या आहेत. तसेच सरकारी धोरणांमुळे शेती आणि रोजगाराचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याने मराठा समाजासमोर आपल्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आजच्या काळात अर्थाशिवाय कशालाच अर्थ नाही. आपले मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तरी किमान आपल्याकडे पैसा असायला हवा. लोकशाहीमध्ये तुमची संख्या किती आहे यापेक्षा तुमचे अर्थकारण किती मजबूत आहे याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच संभाजी ब्रिगेडची पुढील वाटचाल “मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी व्हावी” या दिशेने राहणार आहे. त्यासाठी संभाजी ब्रिगेडने मराठा या शब्दाची नवीन व्याख्या तयार केली आहे. ती व्याख्या अशी :

MARATHA

M = Money (पैसा),

A = Aspiration (प्रेरणा),

R = Resources(साधने),

A = Ambitions (इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा)

T = Talent (ज्ञान, शिक्षण, अनुभव, कौशल्य)

H = Humble (नम्र)

A = Achievement (यश).

थोडक्यात पैसा कमावण्यासाठी जो त्याच्याकडे असणारी प्रेरणा, साधने, इच्छाशक्ती, ज्ञान आणि नम्रता यांचा योग्य वापर करुन यशस्वी होतो, तो आजच्या काळातील मराठा ! आजच्या जगात “डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधीजी” म्हणजेच डोक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि खिशात पैसा असेल तरच तुमचा निभाव लागणार आहे. तर चला मग, संभाजी ब्रिगेडच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीत सामील होऊया. मी मराठा – मी उद्योजक हा विचार सार्थ ठरवूया ! चला जग जिंकूया ! जय जिजाऊ जय शिवराय !

संभाजी ब्रिगेड माहितीपत्रकाची PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा :

Scroll to Top